रानी मुखर्जी चा नवा चित्रपट अय्या
सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेत्री केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटांची चलती आहे. त्यामुळे एकामागोमाग एक अभिनेत्री केंद्रित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पुढील महिन्यात राणीचा 'अय्या' आणि करिनाचा 'हीरोइन' हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सध्या दोघीही आपापल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. राणी तर चक्क चित्रपटातील पात्राप्रमाणे मराठमोळी साडी घालून प्रमोशन करत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, सर्वच म्हणतात की माझा चित्रपट हटके आहे पण माझा 'अय्या' हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा नक्कीच हटके आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची निराशा होणार नाही, असा विश्वास तिने व्यक्त केला. राणी मुखर्जीने 'मीनाक्षी देशपांडे' नावाच्या मराठमोळय़ा तरुणीची भूमिका साकारली आहे. तिच्याबरोबर या चित्रपटात निर्मिती सावंत, सतीश आळेकर, सुबोध भावे यांच्याबरोबरच दक्षिणेचा सुपरस्टार पृथ्वीराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातली मराठी मुलीची भूमिका करताना धमाल आल्याचे राणीने सांगितले. 'ही भूमिका केवळ वेशभूषेतून दाखवता आली नसती. तिच्या बोलण्यातून, वागण्यातून, हसण्यातून, चालण्यातून ही मुलगी मराठी असल्याचे मला दाखवायचे होते. दिग्दर्शक सचिन कुंडलकर व चिन्मय यांनी माझ्यावर त्यासाठी फार मेहनत घेतली. अगदी एका एका शब्दासाठी, योग्य उच्चारांसाठी त्यांनी अनेक दिवस कष्ट घेतले,' असे राणीने सांगितले.
Comments