'वन बिट' फेलोशिपचा मान सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आणि अभिनेत्री आदिती भागवतला

अमेरिकेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य विभाग आणि 'फाऊंड साऊंड नेशन' या संस्थेच्या वतीने संगीत क्षेत्रात देण्यात येणार्‍या 'वन बिट' फेलोशिपचा मान सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आणि अभिनेत्री आदिती भागवतला मिळाला आहे. या संस्थेच्या वतीने आयोजित 7 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दीड महिन्याच्या कार्यक्रमाकरिता ही फेलोशिप असून यासाठी जगभरातून 30 प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत. यामध्ये भारतातर्फे आदिती भागवतचा समावेश असणार आहे. अमेरिकेमधील 'फाऊंड साऊंड नेशन' ही संस्था संगीत क्षेत्रात कार्य करणार्‍या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करते. संगीताच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करणार्‍यांना आणि समाजासाठी योगदान देणार्‍या कलावंतांना या संस्थेच्या वतीने फेलोशिप देण्यात येते. संगीत आणि कलेच्या माध्यमातून जगभरात शांतता आणि ऐक्याचा संदेश देण्यासाठी या 'वन बिट' फेलोशिपची निर्मिती हिलरी क्लिंटन यांच्या दूरदृष्टीतून करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना आदिती म्हणते की, मी मागील अनेक वर्षापासून विविध देशांमध्ये कथ्थकचे कार्यक्रम करीत आहे. यामध्ये कथ्थकच्या शास्त्रीय प्रयोगासोबतच काही फ्युजनचे प्रकारही मी सादर केले. आपल्या भारतीय कलेबद्दल परदेशी लोकांना खूप जास्त आकर्षण आणि आदर आहे. कलेसोबतच ते लोक कलाकारालाही तेवढाच आदर देतात. 'फाऊंड साऊंड नेशन' संस्थेच्या वतीने 'वन बिट' ही फेलोशिप प्रामुख्याने संगीत क्षेत्रातील कलाकारांना दिली जाते. मी जरी शास्त्रीय नर्तिका असले तरी माझ्या मते कथ्थक करताना 'तत्कार' या प्रकारातून आम्ही एक प्रकारचा ताल तयार करत असतो. पदन्यास आणि घुंगराच्या माध्यमातून संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहचतं. त्यामुळे नर्तिकेसोबतच मी स्वत: एक संगीत निर्मातीही असते. माझं हेच मत मी वन बिट फेलोशिपचा फॉर्म भरताना मांडले. शिवाय कथ्थकमध्ये पदन्यासावर लक्ष केंद्रित करता येऊन स्वत:ला तणावमुक्त करता येतं. हा एक प्रकारे मेडिटेशनचा प्रकार आहे. हा नवा प्रयोग मी कथ्थकच्या माध्यामतून करू शकते हा विश्वास मी व्यक्त केला. माझ्या या अनोख्या संकल्पनेचा प्रभाव बहुदा वन बिटच्या संबंधित लोकांवर झाला असेल त्यामुळेच त्यांनी संगीत निर्माती म्हणून या फेलोशिपसाठी निवड केली, अशी पुस्तीही आदितीने जोडली. या फेलोशिपअंतर्गत घेण्यात येणार्‍या दीड महिन्याच्या कार्यक्रमाची सुरुवात फ्लोरिडा शहरापासून होणार आहे. तेथे सर्व कलाकारांना 3 मोबाईल साऊंड स्टुडिओ देण्यात येणार असून पहिल्या पंधरा दिवसांत सर्वानी एकत्र येऊन आपल्या परफॉर्मन्ससाठी संगीताची निर्मिती आणि त्या संबंधीची इतर तयारी करणे अपेक्षित आहे. फ्लोरिडानंतर अँशवेल, वॉशिंग्टनसह इतर बर्‍याच शहरांत फिरून त्या त्या ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये कलेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा सामाजिक हेतू या कार्यक्रमामागे आहे. या शहरांमध्ये फिरल्यानंतर न्यूयॉर्क येथे अंतिम सोहळा रंगणार असून त्यामध्ये विविध देशांतील प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची संधी सहभागी कलाकारांना मिळणार आहे.




Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर