श्रीं ’च्या चरणी‘ श्री पार्टनर’ च्या प्रसिद्धीचा ‘श्री गणेशा’
मराठी साहित्यात प्रचंड लोकप्रिय असलेल्या व.पु.काळे यांच्या ‘पार्टनर’ या कादंबरीवर आधारित ‘श्री पार्टनर’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा ‘श्री गणेशा’ आज प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात श्रींच्या चरणी करण्यात आला.
पर्व क्रिएशन्स निर्मित आणि समृद्धी क्रिएशन्स सहनिर्मित ‘श्री पार्टनर’चे दिग्दर्शक समीर सुर्वे आणि प्रमुख कलाकार सतीश पुळेकर,नायक पद्मनाभ बिंड,नवतारका श्वेता पगार ह्यांनी ह्या चित्रपटाच्या यशासाठी सिद्धीविनायकाला साकडे घातले.
हा सकस साहित्यावरचा दर्जेदार चित्रपट आम्ही मोठ्या मेहनतीने आकाराला आणला आहे, तो आता अधिकाधिक प्रेक्षकांसमोर पोहचवण्यासाठी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन आम्ही प्रसिद्धीचा ‘श्री गणेशा’ करत आहोत असे सतीश पुळेकर ह्यांनी ह्यावेळी सांगितले. यावेळी चित्रपटाचे निर्माते गंधर्व पेडणेकर,सचिन झोटिंग, वीरेंद्र नेवरेकर, सहनिर्माते बाबा काळे तसेच चित्रपटातले इतर कलावंत आणि तंत्रद्न्य तसेच व.पु काळे ह्यांच्यावर फेसबुकमध्ये असलेल्या ग्रुपचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
व.पुंच्या सिद्धहस्त लेखणीतून शब्दबद्ध झालेली ‘पार्टनर’ ही कादंबरी सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्माण होणाऱ्या नात्यांचा, त्या नात्यांच्या गुंतागुंतीचा एक विलक्षण प्रवास वाचकांना घडवते.ह्या कादंबरीचे हे चित्रपट रूप आता प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहे.
Comments