चित्रपट मैत्री

माणसाच्या जीवनात 'मैत्री' या शब्दाला आणि मैत्रीच्या नात्याला खूप महत्त्व आहे. सगळ्या नात्यांमध्ये नि:स्वार्थ, उदात्त मैत्रीचं असं असामान्य नातं आहे. कृष्णा-राधा, कृष्णा-सुदामा ही मैत्रीच्या नात्याची अलौकिक उदाहरणे आहेत. अशाच मैत्रीच्या नात्यावर आधारलेली थोडी लडिवाळ, खटय़ाळ आणि खूप भावनाप्रधान कहाणी म्हणजे 'माझी मैत्रीण.' ग्रीन अँप्पल प्रोडक्शनची पहिलीच कलाकृती असलेल्या या चित्रपटाची निर्माती अपूर्वा नीलेश नाफडे असून सहनिर्माती आहे सुप्रिया सुभाष नाफडे.

मैत्रीच्या नात्याला कलात्मक वळण देणारी ही कथा गायत्री कोलते यांची असून पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन संजीव कोलते यांनी केले आहे. मानवी मनाच्या खूप खाजगी कप्प्याला, मैत्रीला हात घालणारी ही हळुवार कथा आहे. अथर्व आणि कादंबरी या दोन जीवाभावाच्या मित्रमैत्रिणीची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. एका अशा मैत्रिणीची कहाणी जी आपल्या मित्राच्या मन:स्थितीला, भावनांना खूप जपते आणि नकळत मित्राच्या आयुष्यात स्वत:चं असं अस्तित्व निर्माण करते. कथेतील लडिवाळ भावूक जबाबदार मैत्रीण आहे निशा परुळेकर आणि मित्र आहे नीलेश नाफडे. तसेच डॉ. विलास उजवणे, प्रफुल्ल सामंत, सुवर्णा कोलते, तेजश्री बापट, पंढरीनाथ मेदगे आणि बालकलाकार दिवेश मेदगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील गीते संजीव कोलते यांची असून संगीतकार प्रवीण कुंवर यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. प्रवीण कुंवर आणि अपूर्वा नीलेश नाफडे यांनी यातील गीते आपल्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केली आहेत. छायांकन श्यामल चक्रबोर्ती यांचे असून संकलन राम यादव यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता आहेत सुभाष आर. दुरुगकर. 21 सप्टेंबरला हा चित्रपट मुंबई व पुण्यात प्रदर्शित होत आहे. अतिशय वेगळेपण, मनाला सुखावणारे कथानक असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशा यावेळी निर्माते-दिग्दर्शकांनी व्यक्त केली.



Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे