पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे
"पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" दुर्लक्षित इतिहास जगभरातील प्रेक्षकांना परिचित व्हावा यासाठी निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास, (महाराष्ट्र,गुजरात , राज्यस्थान,कर्नाटक,गुजरात, ) संशोधनासाठी २० मान्यवर तज्ज्ञ लेखक - साहित्यिकांना आमंत्रित करून लेखन कार्याची सुरुवात केली. मात्र त्यानंतर महाराष्ट्रासह भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्याने या परिस्थितीतही चित्रपटाच्या लेखन संशोधन कार्यात व्यत्यय येऊ नये यासाठी विशेष काळजी घेत व्हर्च्युवल भेटीगाठींचे आयोजन करण्यात आले. डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटाचं संपूर्ण कथानक पूर्ण झालं आहे. त्याविषयी डॉ. केले सांगतात, "पुण्यशील, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती अहिल्यादेवी होळकरांचा आयुष्यपट अडीच तीन तासात मांडणे तसं खूपच अवघड काम आहे. परंतु त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे., लेखनाचं हे काम करत असताना संपूर्ण होळकर शाही अंगात संचारली गेल्याचा अनुभव येत होता व त्यामुळे अहिल्यादेवी सारखे प्रचंड मोठे व्यक्तिमत्व नव्याने साकारले जात होते".
अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या. त्यांनी प्रजेसाठी केलेल्या महान कार्यामुळे आजही त्यांचा लौकिक आहे. धर्म, संस्कृती परंपरा यांचा सन्मान करून प्रसंगी हातात तलवार घेऊन,राजकारणाचा आदर्श निर्माण करून, त्यांनी आपले साम्राज्य समृद्ध केले. अनेक किल्ले, विश्रामगृहे,घाट, विहीरी आणि रस्ते तयार करण्यासाठी त्यांनी सरकारी पैशांचा, वापर न करता स्वतःच्या पैशाचा , हुशारीने वापर केला. लोकांसोबत सण साजरे केले. केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी हे कार्य केले आहे. सोमनाथ, काशी, गया, अयोध्या, द्वारका, हरिद्वार, कांची, अवंती, बद्रीनारायण, रामेश्वर, मथुरा आणि जगन्नाथपुरी अश्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी दानधर्म केले. या बरोबरच, त्यांनी लोकांसाठी वाराणसीचा गंगा घाट, उज्जैन, नाशिक, विष्णुपाद मंदिर आणि बैजनाथ या मुख्य तीर्थक्षेत्रांच्या आसपास अनेक घाट आणि धर्मशाळा बांधल्या. मुघल यवन आक्रमकांनी पाडलेली मंदिरे पाहून त्यांनी, सोमनाथमध्ये शिव मंदिर बांधले. आणि अनेक मंदिराचा जिर्णोद्धार केला,आणि अनेक दर्गे व मशिदी बांधण्या साठीही त्यांनी देणग्या दिल्या, अहिल्यादेवींच्या अफाट कार्याचे सूक्ष्म निरीक्षण करून एका अडीच तासाच्या चित्रपटात मांडण्याचे कसब दिग्दर्शक दिलीप भोसले यांना पेलावायचे आहे. त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेण्यासाठी ते गेली तीन वर्षे अथक परिश्रम करीत आहेत.
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य आजच्या कठीण परिस्थितीतही अत्यंत मार्गदर्शक आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श समाजापुढे - देशापुढे ठेवला आहे. त्यांच्या कार्याची माहिती आजच्या नव्या पिढीला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अगदी योग्य वेळी हा चित्रपट आम्ही तयार करीत असून महाराष्ट्रासह जगभरातील तरुण प्रेक्षक या चित्रपटाशी, अहिल्यादेवींच्या कार्याशी नक्की एकरूप होतील", असे मत निर्माते बाळासाहेव कर्णवर-पाटील यांनी व्यक्त केले. लवकरच अहिल्यादेवींच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
Comments