‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य चित्रपटाचे शूटिंग पूर्ण
अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट आहे. कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च असतो. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते आणि त्याची संपूर्ण तयारी झाली असताना लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे शूटिंग थांबवावे लागले. या बाकी राहिलेल्या शूटिंगला सात महिन्यांनातर परवानगी मिळाली,भोर येथे नव्याने भव्य सेट उभारण्यात आला, सर्व तयारी झाली, शूटिंगला सुरुवात झाली आणि पावसाने जोरदार हजेरी लावत परत एकदा व्यत्यय आणला. मात्र ‘सरसेनापती हंबीरराव’ च्या लढाऊ मावळ्यांनी आलेल्या संकटाशी दोन हात करत नियोजित शूटिंग मोठ्या जिद्दीने पूर्ण केले.
पावसाबरोबर यशस्वी मुकाबला करत शूटिंग पूर्ण करताना दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी पहाटे पाऊस पडला होता. आज शिवराज्याभिषेक सोहळा शूटिंग करतानाही पाऊस पडत आहे, या पावसामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण झाला तरी आम्ही ही बाब सकारात्मक म्हणून बघतो.
याविषयी बोलताना निर्माते संदीप मोहिते-पाटील म्हणाले, लॉकडाऊन मुळे तीन दिवसांचे शूटिंग बाकी होते. परवानगी मिळाल्यानंतर शूटिंग सुरू केले. मात्र ऐन शूटिंगच्या वेळी वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भव्य सेटचे मोठे नुकसान झाले असले तरी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, डिओपी महेश लिमये, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, देवेंद्र गायकवाड, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे यांच्यासह संपूर्ण टीम या संकटाशी यशस्वीपणे झुंजली आणि नियोजित शूटिंग वेळेत पूर्ण केले ही बाब आमचा उत्साह वाढवणारी आहे. आता पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण करून ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट प्रदर्शनासाठी आम्ही तयार ठेवणार आहोत.
Comments