अभिनेता कुशल बद्रिकेने मानले शिवसेना चित्रपट सेनेचे आभार
शिवसेना चित्रपट सेनाही मराठी कलाकारांना न्याय मिळवून देणारी एकमेव संघटना असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकप्रिय विनोदी अभिनेता कुशल बद्रिके याची हुप्पा हुय्या या चित्रपटातली भूमिका विशेष गाजली होती,मात्र गेली पाच वर्ष या भूमिकेचे ठरलेले मानधन देण्यास निर्माते टाळाटाळ करत होते.नुकतेच अनेक चित्रपट -मालिका कलावंतांना शिवसेना चित्रपट सेनेच्या प्रयत्नाने थकीत मानधन मिळाले होते.या पार्श्वभूमीवर कुशलने आपली व्यथा शिवसेना चित्रपट सेनेकडे मांडली.त्याच्या या थकीत मानधनाच्या प्रकरणाचा प्रश्न शिवसेना सचिव,अध्यक्ष शिवसेना चित्रपट सेना-अभिनेता आदेश बांदेकर यांनी शिवसेना स्टाईलने सोडवला.
कुशलला आता कधीच मिळणार नाही असे वाटलेले मानधन तब्बल पाच वर्षानंतर मिळाले,याबद्दल कुशल म्हणाला कि पाच वर्षापूर्वी हुप्पा हुय्या या चित्रपटासाठी माझे जे मानधन ठरले होते त्यापैकी ३२ हजार रुपये मला मिळाले नव्हते,हे पैसे मिळावेत म्हणून मी जवळपास दीडशे फोन कॉल्स, सतत दोन वर्ष निर्मात्यांना केले,पण प्रत्येक वेळेस टाळाटाळच नशिबी आली.अखेर या पैशांवर मी पाणी सोडून दिले होते. आदेश बांदेकर यांनी कलावंतांच्या थकीत मानधनाचा प्रश्न जेव्हा सोडवण्यास सुरवात केली तेव्हा माझ्या या थकीत मानधनाचा विषय निघाला आणि त्यांनी तुझे पैसे तुला मिळतील असा शब्द दिला.आश्चर्य म्हणजे दोन दिवसांपूर्वी निर्माते समित कक्कड आणि अमर कक्कड यांच्या निर्मिती संस्थेतून त्याला त्याच्या थकीत रक्कमेचा चेक सन्मानाने देण्यात आला. या घटनेमुळे कुशल भारावून गेला आहे.
पाच वर्षांपूर्वी माझ्यासाठी बत्तीस हजार रुपयेही मोठी रक्कम होती,उन्हातान्हात शुटींग करून कमावलेले माझ्या घामाचे,माझे हक्काचे पैसे कोणीतरी लुबाडत होते,ते पैसे मिळवून देणारा, आपुलकीने आपल्या पाठीशी उभा राहणारा आदेश बांदेकर यांच्यासारखा भक्कम आधार आपल्या पाठीशी आहे,याचा मला अभिमान आहे अश्या शब्दात कुशलने आपली कृतज्ञता व्यक्त केली.
या घटनेबद्दल बोलताना शिवसेना सचिव, अध्यक्ष शिवसेना चित्रपट सेना-अभिनेता आदेश बांदेकर म्हणाले कि कुशल प्रमाणेच अनेक मराठी कलावंतांच्या समस्या शिवसेना चित्रपट सेना सध्या यशस्वीपणे सोडवत आहे ,मात्र माझे निर्मात्यांना सांगणे आहे कि त्यांनी मराठी कलावंत आणि तंत्रज्ञांचे ठरलेले मानधन वेळेत देवून टाकावे आणि सौहार्दाचे वातावरण टिकवावे अन्यथा शिवसेना चित्रपट सेना त्यांच्या पद्धतीने कलाकारांना न्याय मिळवून देईल.
Comments