मन हे वेडे या गाण्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद ...

शंकर मराठे - मुंबई, २ डिसेंबर : 'यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे तसेच ‘तुझं माझं जमतय’ या झी युवावर सुरू असलेल्या मालिकेतील अभिनेता रोशन विचारे यांनी अभिनय केलेल्या ‘मन हे वेडे’ या गाण्याला युट्युबवर अवघ्या ४ दिवसांत २ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे, तसेच विविध वाहिन्यांवर देखील गाण्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मन हे वेडे या गाण्याची निर्मिती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे स्वप्नपूर्ती आहे. ‘मन हे वेडे’ हे खूप हळुवार आणि रोमँटिक गाणं आहे. आयुष्यात अनेकदा असं होतं की आपल्याला प्रेम व्यक्त करता येत नाही, अशा अनेक गोष्टी असतात ज्या बोलता येत नाहीत. प्रेमात प्रचंड ताकद आहे. मन हे वेडे गाणं अशाच अनेक अव्यक्त भावनांना प्रेमाचा हळुवार स्पर्श करतं, पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमाची ती जादू अनुभवायला लावतं. स्मिता शेवाळे आणि रोशन यांनी आपल्या अभिनयातून या भावना अतिशय सुरेख पद्धतीने मांडल्या आहेत. 

मन हे वेडे या गाण्यात ऐश्वर्या माने आणि पुजा चाफेकर यांची देखील झलक पहायला मिळणार आहे. या गाण्याचं दिग्दर्शन योगेश अनिल तावर यांनी केलं असून डि.ओ.पी. राहुल झेंडे आहेत. या गाण्याला आपल्या सुरेल आवाजाने अन्वेशाने स्वरबद्ध केला असून जीवन मराठेने संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन देवश्री आठल्ये यांनी केले असून वेशभूषा श्वेता तातूसकर आणि रंगभूषा हर्षद खुले यांनी केली आहे. निर्मिती प्रमुख वैभव लामतुरे तर कार्यकारी निर्माता म्हणून अमोल घोडके यांनी कार्यभार सांभाळला आहे. मन हे वेडे हे गाणं पुण्यातील नयनरम्य अश्या स्नॅपसिटी, तळेगाव या ठिकाणी चित्रीत झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर