मी नाटकांतून कामं करीत असे व रंगमंच आणि चित्रपट याविषयी भयंकर आकर्षण वाटे. माझा एक मित्र होता, सुधीर हुलगे नावाचा, (नाव लिहिलंय कारण कुठल्याही अविश्वासाला थारा नसावा) जो त्यावेळी एका नावाजलेल्या कॅमेरामनचा असिस्टंट होता. अंधेरीतील फिल्मालया स्टुडियोत एका चित्रपटाचे शूटिंग सुरु होते ज्यात ऋषी कपूर व रवीना टंडन मुख्य भूमिकांत होते. सुधीरने मला शूटिंग बघायला बोलावले व मी देखील गेलो. मी कामावरून आल्यावर जवळच असलेल्या फिल्मालयात जात होतो. सुधीरने माझ्या अनेकांशी ओळखी करून दिल्या होत्या त्यामुळे चरित्र अभिनेते, इतर असिस्टंट्स मला ओळखू लागले होते. तिसऱ्या वा चवथ्या दिवशी एक असिस्टंट डिरेक्टर, ज्याच्याबरोबर माझी ओळख झालेली होती व रोज नमस्कार-चमत्कार होत होते) माझ्यापाशी आला व त्याने मला एक विनंती केली. त्याचं झालं असं होतं की त्या संध्याकाळी रवीना व ऋषी वर एक गाणे चित्रित होणार होते. रवीना आली होती परंतु ऋषी कपूर इतर ठिकाणी (तो त्यावेळी दोन-दोन, तीन-तीन शिफ्ट्स करीत असे) शूटींगमध्ये अडकला होता व त्याने फिल्मालयात पोहोचण्यास असमर्थता दर्शविली होती. सर्व तयार होते व शूटिंग कॅन्सल करणे परवडणारे नव्हते. त्यामुळे शूटिंग करण्याचा निर्णय झाला होता. रवीनाचे पोर्शन्स उरकून घेण्याचे ठरले परंतु काही फ्रेम्समध्ये ऋषी कपूर असणे गरजेचे होते व गोची तिथेच झाली होती. त्या असिस्टंट डिरेक्टरने मला आर्जव केले की मी ऋषीचा डुप्लिकेट बनून त्यांची मदत करावी. मला सुरुवातीला खरंतर भीती वाटली व मी सुधीरला विचारून सांगतो असे म्हणालो. त्यावर तो बोलला की सुधीर कॅमेरामॅनच्या कामासाठी कुठेतरी गेलाय व त्याला येण्यास बराच वेळ लागेल. हे ऐकून मी अजूनच धास्तावलो परंतु त्या असिस्टंटने मला विनंती करणे सुरूच ठेवले, हे सांगत की मला थिएटरचा बॅग्राऊंड आहे व माझी देहयष्टी ऋषी बरोबर मॅच होते. त्याने मला आश्वस्त केले की सुधीरला काही प्रॉब्लेम नसणार व तो त्याच्याशी बोलेल, तो परतल्यावर. मी मानसिकरीत्या तयार झालो व त्याने लगेच मला मेक-अप रूम मध्ये नेले. तेथे मला ऋषी कपूर वापरणार होता तो कोरा करकरीत ऑफ-व्हाइट रंगाचा कुर्ता-चुरीदार दिला व चेंज करण्यास सांगितले. मी पुन्हा एकदा, कोणाच्या तरी कामी येतोय असा उदात्त वगैरे, विचार करून कपडे बदलले व फ्लोअर वर आलो. मी मध्ये व आजूबाजूला भरपूर लाईट्स, माणसाची वर्दळ, मोठा कॅमेरा आणि खास खुर्चीत बसलेला दिग्दर्शक पाहून, नाही म्हटले तरी एक आंतरिक सुखद लहर अनुभवली. दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे मी एका झाडाला टेकून बसलो व समोरून पांढऱ्या कपड्यातील रवीना अवतरली. (ती इतकी सुंदर दिसत होती की तो क्षण माझ्या मनावर कोरला गेलाय व मी आजन्म रवीना-फॅन राहण्याची प्रतिज्ञा केली होती व ती पाळलीय) तिलाही दिग्दर्शकाने काही सूचना दिल्या व ‘साउंड, कॅमेरा, ऍक्शन’ हे शब्द माझ्या कानावर पडले. समोर रवीना गात (अर्थातच लीप मूव्हमेन्ट करत) मला म्हणजेच ऋषीला खुणावत होती व कॅमेरा माझ्या खांद्यावरून ते क्षण टिपत होता. दोन-तीन रिटेक्स झाले (माझ्यामुळे अजिबात नाही हं). तीन-चार वेगवेगळ्या अँगल्सनी वेगवेगळे शॉट्स चित्रित झाले, ऑफ कोर्स माझा फ्रंट अव्हॉइड करून व नंतर माझे पॅक-अप झाल्याचे सांगण्यात आले. तो मोमेन्ट, तो परिबल, तो क्षण माझ्यासाठी केवळ आणि केवळ ऋषी कपूर मुळे आला होता हे मात्र नक्की. (ता.क. मी अभिनय केलेल्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित केले होते व हा दीड डझन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेला चित्रपट भारतातर्फे ‘ऑस्कर’ ला अधिकृतरीत्या पाठविण्यात आला होता.)
— कीर्तिकुमार कदम
Comments