गुरुपौर्णिमेनिमित्त झाले ‘देऊळ बंद 2' चित्रपटाच्या स्क्रिप्टचे पूजन
मागील सहा महिन्याहून अधिक काळ संपूर्ण जगात कोरोनाची दहशत पसरलेली आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन असलेल्या आपल्या देशात आता अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे, नुकतीच आषाढी एकादशी झाली, मात्र वारकऱ्यांशिवाय यंदा पंढरपूर सुनेसुने होते. दरवर्षी गुरुपौर्णिमेला अनेक मंदिरं भक्तांच्या गर्दीने फुलून जातात मात्र यंदा हे चित्र बघायला मिळाले नाही. भक्तांच्या मनात देवाच्या भेटीला जाता आले नाही याची हुरहूर आहे, यामुळे सध्याची परिस्थिती म्हणजे ‘आता परीक्षा देवाची...’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशा या निराशेच्या वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन संवेदनशील लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे ‘देऊळ बंद 2’ घेऊन येत आहेत. ‘आता परीक्षा देवाची...’ अशी टॅग लाईन असलेल्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे पूजन गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर करण्यात आले,अशी माहिती प्रविण तरडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे दिली. या प्रसंगी त्यांच्या सोबत निर्माते कैलास वाणी, जयश्री कैलास वाणी, जुईली वाणी-सुर्यवंशी , कैवल्य वाणी उपस्थित होते.
2015 साली आलेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत संपूर्ण महाराष्ट्रात दणदणीत यश मिळविले होते. त्या चित्रपटात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्यात आली होती. तर वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची...’ या चित्रपटाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ मधूनही शेतीच्या समस्येवर अतिशय संवेदनशिलपणे भाष्य केले होते यामुळे या चित्रपटाबद्दलचे औत्सुक्य अधिकच वाढले आहे.
‘देऊळ बंद’ चित्रपटाला महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता, तसेच यश ‘देऊळ बंद2 – आता परीक्षा देवाची...’ या चित्रपटालासुद्धा मिळेल असा विश्वास निर्माते कैलास वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केला. ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे वैशिष्ट्य म्हणजे प्रविण तरडे यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत या चित्रपटाचे लेखन सुरू केले आणि संपूर्ण स्क्रिप्ट लिहून पूर्ण केली. ‘आता परीक्षा देवाची...’ अशी टॅग लाईन असलेल्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात शेतकर्यांच्या नेमक्या कोणत्या प्रश्नांना वाचा फुटणार? चित्रपटात कलाकार कोण असतील? हे जाणून घेण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. 'देऊळ बंद' मधे मोहन जोशींनी साकारलेले स्वामी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायेत... मग आता स्वामी कोण...? का पुन्हा तेच...?असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत... 2020 च्या गुरुपौर्णिमेला घोषणा करण्यात आलेला ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट 2021 मधील गुरुपौर्णिमेला जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही प्रविण तरडे यांनी सांगितले.
Comments