'मी मराठी'ची नवीन मालिका 'वृंदावन'

'मी मराठी' वाहिनीच्या उत्तम संहितेवर आधारलेल्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत. काळानुसार श्रद्धा व्यक्त करण्याची माध्यमं बदलली परंतु श्रद्धेची व्याख्या आणि व्याप्ती मात्र बदलली नाही. 'मी मराठी' वाहिनीवर याच आशयाची 'वृंदावन' ही कौटुंबिक मालिका आपल्या भेटीस येत आहे. येत्या २२ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वा. या मालिकेचे प्रसारण सुरु होत आहे. कार्तिकीच्या अनोख्या पांडुरंग भक्तीची कथा यात गुंफण्यात आली असून पंढरपूर येथे या मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
'वृंदावन' ही कथा आहे, एका साध्या, सुस्वभावी, सुंदर कार्तिकी नावाच्या तरुणीची. पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री राहणार्‍या कार्तिकीची पांडुरंगावर अमाप श्रद्धा आहे. विठ्ठल भक्तीच्या मार्गावर जाताना प्रत्येक गोष्टी आपल्या या देवाच्या इच्छेनेच होतात असा तिचा ठाम विश्वास आहे. अशा या पंढरपुरात प्रतिष्ठित कुलकर्णी घराणं देवदर्शनाला येतं. योगायोगाने कुलकर्णी घाराण्याला सुपुत्र पद्मनाभची भेट कार्तिकीशी होते, पाहताक्षणी त्याला ती आवडते आणि दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्याचा विवाह ठरतो. पण लग्नाच्या वेळी अशा काही घटना घडतात की, कार्तिकीच्या आयुष्यात वेगळेच वळण येते.
अशा कठीण परिस्थितीत पांडुरंग आपल्या पाठीशी सदैव उभा आहे ही श्रद्धाच तिला जगण्याची नवी उमेद देतो. कार्तिकी एखाद्या तुळशी वृंदावनाप्रमाणे घराला शितलता, आनंद देत राहते. कशी आहे कार्तिकी. . . ?
तिच्या आयुष्यात कोणते अनपेक्षित वळण येते? आणि तिला कोण कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो हे उत्सुकता वाढविणारे असले तरी मालिका सुरु होण्याची वाट पहावी लागणार आहे.
सौ. नीता देवकर आणि सौ सुधा गुप्ता यांच्या 'सुर्यतेज प्रॉडक्शन प्रा.लि.' या संस्थेची निर्मिती असलेल्या आणि अनुभवी दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वृंदावन' या मालिकेत रविंद्र मंकणी, स्वाती चिटणीस, कुलदीप पवार, उमा सरदेशमुख, अनिरुद्ध हरीप, शीतल पाठक, रविंद्र महाजनी, ममता चातुर्य, किशोरी शहाणे, मेघना वैद्य, ममता, नयना जाधव, आशिष कुलकर्णी, अश्विनी आपटे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा शिरीष लाटकर यांनी लिहीली असून संवाद नीता नामजोशी यांचे आहे.
वेगवेगळ्या वयोगटाच्या प्रेक्षकांच्या अभिरुचीची दखल घेत 'मी मराठी' वाहिनीने नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी केली आहे. २२ फेब्रुवारीपासून सोम. ते शुक्र. ७.००वा. प्रक्षेपित होणारी 'वृंदावन' ही मालिका सुद्धा याच पंक्तीत मोडणारी असून प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर