शंकर मराठे - मुंबई, २५ नोव्हेंबर : सध्या संपूर्ण जग हे इंटरनेटमुळे एकत्र आल्या कारणाने या लॉकडाऊनमध्ये देखील सर्वाना घरबसल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती, आणि याच संधीचा फायदा घेत आगामी विविध मराठी सिनेमांच्या घोषणा होत गेल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी मराठी चित्रपट "लॉ ऑफ लव्ह" चे टिझर पोस्टर आणि मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नेटकऱ्यांच्या उदंड प्रतिसादा नंतर आता निर्माता आणि अभिनेता जे. उदय त्यांचा "लॉ ऑफ लव्ह" हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित करणार असल्याची घोषणा सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वरून करण्यात आली आहे. मोठ्या पडद्यावर येण्याच्या दमदार तयारीत असलेला सी.एस. निकम दिग्दर्शित " लॉ ऑफ लव्ह" सिनेमा प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा आहे. पोस्टरवर झळकणारे दोन नवे चेहरे या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहेत.
लॉ ऑफ लव्ह हे नाव जसं हटके आहे अगदी तशीच त्याची कहाणी देखील हटके आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलावार कायद्या रुपी गळ टाकल्यावर त्यांच्यावर याचा काय परिणाम होतो हे या चित्रपटाद्वारे निर्माते जे. उदय प्रेक्षकांना सांगणार आहेत. नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळालेला हा विषय नव्याने मोठ्या पडद्यावर पाहणं सगळ्यांसाठी उत्तम पर्वणी ठरणार आहे. लॉ ऑफ लव्ह सिनेमाच्या माध्यमातून जे. उदय आणि शाल्वी शाह यांची नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर, अभिनेते अनिल नगरकर आणि अभिनेत्री प्राची पालवे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा, पटकथा आणि निमिर्ती जे. उदय यांचीच आहे. सिनेमातील संवाद जे उदय आणि मकरंद लिंगनूरकर यांनी लिहिले आहेत. संगीतकार पी. शंकरम यांनी सिनेमाला संगीत दिले असून मुराड तांबोळी, पी. शंकरम आणि निलेश कोटके यांनी गीतलेखन केलं आहे. पी. शंकरम, मुग्धा इनामदार आणि राधिका अत्रे यांनी सिनेमातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. प्रेमाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी सिनेमाची जान आहेत. धडाकेबाज ऍक्शन आणि डायलॉगची तुफान फटकेबाजी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी आहे. मुंबई, कुडाळ आणि कोल्हापूरच्या नयनरम्य ठिकाणी चित्रित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांना अनोखा अनुभव देईल. सिनेमाचे छायांकन मंजुनाथ नायक, संकलन मनीष शिर्के, कला सतीश बिडकर, नृत्य ताज खान, ऍक्शन देव राज, ध्वनी संरचना दिनेश उच्चील आणि शांतनु आकेरकर (डी सुपर साउंड) यांनी केली आहे. मनोरंजनात तसेच जगण्यातील तोच तोचपणा बाजूला सारत मस्त रिफ्रेश करणारा वेदिका फिल्म्स क्रिएशन निर्मित "लॉ kओफ लव्ह" संपूर्ण महाराष्ट्रात ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Comments