भव्य रांगोळीतून साकारले ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’चे पोस्टर
Shankar Marathe, Mumbai - 14 November, 2020 : मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने जगभर जनजीवन विस्कळीत केले आहे. महाराष्ट्रातही मोठया प्रमाणात कोरोना रुग्ण होते या कोरोना विषाणूचा वध लवकर झाला पाहिजे यासाठी पुण्यातील तळजाईमाता मंदिराबाहेर ‘सरसेनापती हंबीरराव’ या आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे भव्य रांगोळी पोस्टर साकारण्यात आले आहे. ‘’कोरोनासुराचा" वध करण्यासाठी "दार उघड बये... दार उघड..." असे या रांगोळीत म्हटले आहे. या रांगोळीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
प्रविण विठ्ठल तरडे यांचे लेखन, दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची निर्मिती उर्वीता प्रॉडक्शन यांची असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
या भव्य रांगोळी पोस्टर विषयी अधिक माहिती देताना निर्माते संदिप मोहिते पाटील म्हणाले, सासवड येथील रांगोळी आर्टिस्ट मयूर दुधाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही भव्य रांगोळी साकारली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिन्यांपासून समाजात काही प्रमाणात नैराश्याचे वातावरण पसरले आहे. दिवाळीमध्ये समाजात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी ‘कोरोना’ रूपी राक्षसाचा वध करण्याचे साकडे आम्ही या रांगोळीच्या माध्यमातून देवीला घातले आहे.
रांगोळी आर्टिस्ट मयूर दुधाळ म्हणाले की, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची ही भव्य रांगोळी काढण्यासाठी आम्हाला 13 तास लागले. आम्ही सकाळी 7 वाजता रांगोळी काढायला सुरवात केली व रात्री 8 वाजता ती पूर्ण झाली. 10 सहकाऱ्यांनी ही रांगोळी काढण्यासाठी मदत केली. यासाठी सुमारे 90 किलो रांगोळी लागली, या रांगोळी पोस्टरचा आकार 20 बाय 25 फुट आहे.
Video link -
Comments