प्रभात युगाचा गौरव करण्यासाठी ‘प्रभात -फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट' नामकरणाची शिवसेना चित्रपट सेनेची मागणी
भारतीय चित्रपट सृष्टीला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत,भारतीय सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस दाखविणारा पुण्यातील ‘प्रभात’ चाही येत्या एक जूनला वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफ.टी.आय.आय) या संस्थेचे नामकरण ‘प्रभात - फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट' करावे अशी मागणी शिवसेना सचिव,अध्यक्ष शिवसेना चित्रपट सेना-अभिनेता आदेश बांदेकर यांनी केली आहे.
येत्या एक जूनला प्रभातच्या वर्धापनदिनी या नामकरणाची घोषणा करून मराठी सिनेमाला प्रभातकाळ दाखविणार्या प्रभातच्या या अनमोल योगदानाला मानवंदना द्यावी अशी शिवसेना चित्रपट सेनेची मागणी आहे.
सध्या एफ.टी.आय.आयचे संचालक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी दिल्लीत आहेत,ते पुण्यात परतल्यावर या संदर्भातले निवेदन मराठी कलावंतांच्या शिष्टमंडळामार्फत त्यांना देण्यात येईल.
चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत प्रभात युग अवतरले. ‘संत तुकाराम’, ‘माणूस’, ‘गोपाळकृष्ण’, ‘शेजारी’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘कुंकू’, ‘रामशास्त्री’ यांसारखे असंख्य दर्जेदार चित्रपट प्रभातने मराठी रसिकांना दिले. या कंपनीने मराठी चित्रपटसृष्टीला ‘प्रभात’ दाखवली. पुण्यातील प्रभातच्या स्टुडिओने असंख्य कलावंत रत्ने दिली. काळाच्या ओघात प्रभात युग ओसरले आणि या स्टुडिओ परिसरात फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट संस्था उभी राहिली याकडे बांदेकर यांनी लक्ष वेधले आहे.
येत्या एक जूनला या प्रभातचा ८४ वा वर्धापन दिनही आहे. नव्या पिढीला प्रभातचा करिष्मा कळावा आणि ‘प्रभात’ने दिलेल्या योगदानाचा सन्मान व्हावा यासाठी ,भारतीय सिनेसृष्टीच्या शतसांवत्सरिक वर्षात ‘प्रभात - फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ असे नामकरण करून प्रभातच्या उज्ज्वल परंपरेचा सन्मान करावा, अशी मागणी अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी शिवसेना चित्रपट सेनेच्यावतीने केली आहे.
Comments