भारतीय संवेदनेचा सन्मान – दिग्दर्शक गजेंद्र अहिरे
मुंबई - गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनुमती या चित्रपटाला मानाच्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कुष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले आहे. अभिनेते विक्रम गोखले यांना अनुमतीसाठीच सर्वोत्कुष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान न्युयॉर्क इथे पार पडलेल्या या महोत्सवात देशविदेशातल्या भारतीय वंशाच्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखवण्यात आले. त्यातून परीक्षक मंडळाने अनुमतीला सर्वोत्कुष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवले.
हंसल मेहता यांना शहीद या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तर दीप्ती नवल यांना लिसन अमया चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले.
अनुमतीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणाले कि हा भारतीय संवेदनेचा सन्मान आहे. कुटुंब,नवरा –बायको,त्यांचे सहजीवन त्यांचे प्रतिकूल स्थितीतही अजोड असणारे भावबंध या भारतीय संवेदना परदेशातल्या लोकांनाही आपल्याश्या वाटल्या आहेत,अनुमतीचा विषय वैश्विक असणे हेच या चित्रपटाच्या लोकप्रियतेचे गमक आहे. विक्रम गोखलेजी या चित्रपटातली भूमिका अक्षरश: जगले असून त्यांचा अप्रतिम अभिनय आणि गोविंद निहलानी यांचे छायाचित्रण हेच या चित्रपटाचे बलस्थान आहे.
Comments