'लालबाग परळ' चित्रपटाच्या पहिल्या लूकचे अनावरण

मराठी चित्रपटांच्या इतिहासात प्रथमच, दार मिडीया प्रायव्हेट लिमिटेडच्या दार मोशन पिक्चर्स या मनोरंजन विभागाने प्रख्यात अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासमवेत 'लालबाग परळ' या मराठी चित्रपटाचे अनावरण नुकतेच मुंबईत करण्यात आले. दोन वेगवेगळ्या निगेटीव्हज असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांत एकाच बेळी करण्यात आले असून 'लालबाग परळ' हा मराठी चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानुसार, हिंदी चित्रपट सिटी ऑफ गोल्ड- मुंबई १९८२: एक अनकही कहानी ची सुरुवात गेल्याच महिन्यात करण्यात आली.
भावनेने ओथंबलेल्या अविस्मरणीय सायंकाळी ५०००हून अधिक गिरणी कामगारांच्या उपस्थितीत त्यांच्याच वास्तव जीवनातील अनुभवांवर आधारलेल्या या चित्रपटाचे अनावरण करण्यात आले. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि निर्माते अरुण रंगाचारी यांनी चित्रपटाच्या पहिल्या लूकचे अनावरण करण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या गिरणी कामगार आणि नेत्यांची निवड केली. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार सतीश कौशिक, सीमा विश्वास, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, करण पटेल, विनीत कुमार सिंग, शशांक शेंडे, वीणा जामकर हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत लोकप्रिय नाटयलेखक आणि पत्रकार जयंत पवार, छायाचित्रकार अजित रेड्डी, संगीत दिग्दर्शक अजित परब, तसेच रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्ती आणि सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते उपस्थित होते.
भरत जाधव आणि वैभव मांगले यांनी एका धमाल प्रश्नोत्तराने जनसमुदायाला गुंगवले. एका प्रश्नाला उत्तर देताना भरत म्हणाला की, मी गिरणगावातील रहिवासी आहे आणि 'अधांतर' या मराठीतील यशस्वी नाटकाचा एक भाग आहे. 'लालबाग परळ' हा चित्रपट जितका दुसर्‍या कोणाचा म्हणजे गिरणी कामगार आणि महाराष्ट्रातील लोकांचा आहे तितकाच तो माझाही आहे. याप्रसंगी चित्रपटाची पाच मिनिटाची झलक दाखवली गेली. चित्रपटातील कलाकारांमधील काहीजणांनी उपस्थितांचे हलकेफुलके मनोरंजन केले. क्रांती रेडकर, रेशम टिपणीस, मानसी नाईक आणि सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर अन्य महत्त्वपूर्ण मराठी कलाकारांनी सहभाग घेतला. काही लोकप्रिय नृत्यावर सादरीकरण करण्यात आले.
या चित्रपटाविषयी बोलताना दार कॅपिटल ग्रूपचे अध्यक्ष अरुण रंगाचारी म्हणाले, " दार मोशन पिक्चर्सचा उद्देश हिंदी चित्रपटाच्या मुख्य स्त्रोताबरोबरच प्रादेशिक चित्रपटक्षेत्रात सर्जनशील संकल्पना विकसित करणे असा आहे. 'लालबाग परळ' या आमच्या चित्रपटाच्या कथेमध्ये याचे स्पष्ट प्रतिबिंब पडत असून महेशसारख्या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले आहे. महेशने बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक असून आम्हाला खात्री आहे की, हा वर्षभरातील महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक ठरेल.
'लालबाग परळ' हा स्टायलिश आणि हृदयाचा ठाव घेणारा चित्रपट असून १९८२ मध्ये झालेल्या गिरणी संपावर आधारीत आहे. गिरणीकामगाराच्या कुटुंबाला झालेला त्रास आणि यातना यांचे चित्रण यात करण्यात आले आहे. यात ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील राजकीय - सामाजिक वातावरण चित्रीत करण्यात आले असून मुंबईत संघटीत गुन्हेगारी कशाप्रकारे उदयाला आली या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय वातावरणाने होरपळलेल्या एका कुटुंबाची कथा मंडलेली आहे.
या चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करतांना महेश मांजरेकर यांनी सांगितले "कलात्मकतेला वेळेचे बंधन नसते, मी 'लालबाग परळ' या प्रकल्पावर गेली ३ वर्ष काम करत आहे. मला असे वाटते की आजच्या तरुण पिढीला यामागील सत्य समजावे व संधीचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या शहराचे वास्तव त्यांना कळावे. मुंबईला एकत्र आणण्याबरोबरच त्यामागील सत्य लोकांपुढे यावे असे मला वाटते. या चित्रपटात आम्ही १९८० च्या कालावधीत मुंबईतील गिरणी कामगारांनी ज्या कोर्टकज्ज्यांतून मार्ग काढला ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे." वडाळ्यासारख्या- गिरणगावात माझे बालपण गेल्याने मी या अगदी तळागाळातील गिरणी कामगारांचे जीवन अगदी जवळून पाहिले आहे. म्हणूनच हा विषय केवळ माझ्यासाठी खूपच जवळचाच नाही तर तो मी आजपर्यंत केलेल्या कामांपेक्षा खूपच आकर्षक असा ठरला. आज येथे उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यातील भाव पाहून आता मी या चित्रपटाच्या भवितव्यासाठी निश्चिंत आहे." असे ते म्हणाले.
या चित्रपटाबरोबरच दार मोशन तर्फे अशा प्रकारच्या दहा विविध चित्रपटांच्या निर्मितीची योजना असून ते विविध भाषांमध्ये २०१२ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर २०१०च्या शेवटी सुरु होणारे त्यांचे पुढील चित्रपट हे हिंदी तसेच स्थानिक भाषांमध्येही असतील.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA