कलाश्रमची 'आमची धुन, तुमचे गुण' स्पर्धा
शंकर मराठे - मुंबई, १६ जानेवारी २०२१ : स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्राच्यावतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य करणाऱ्या 'कलाश्रम' च्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला अभिनव स्पर्धा घेण्यात येते. 'आमची धुन, तुमचे गुण' ही कलाश्रमची या महिन्यातील पंचवीसावी स्पर्धा आहे. बॅन्जो मास्टर गिरिधर जाधव-हसोळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धकांना बासरी, तबला आणि संतूर यांची धुन दिली जाणार आहे. काही मिनिटांच्या असलेल्या या धुनपैकी स्पर्धकांनी कोणत्याही एका धुनवर आवडती कविता, स्वतःचे मनोगत, पुस्तकातील उतारा, संस्मरणीय स्वत:चा अनुभव किंवा कोणतेही निवेदन यापैकी एक जे परिक्षकांना भावेल असे सादरीकरण व्हिडिओच्या स्वरुपात फक्त मराठीतूनच करायचे आहे. नृत्य, नकला यांचे व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत. तुमच्या सादरीकरणात आम्ही दिलेली धुन वाजणे आवश्यक आहे. व्हिडिओ ९८६९००८८०५ / ८८२८२१८८०५ या वॉट्सअप क्रमांकावर २५ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवायचा आहे. सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ स्पर्धकाला रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते दिले जाणार आहे. शनिवार ३० जानेवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथील पु. ल. कला अकादमीच्या अॅनिमेशन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. अशोक हसोळकर यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले आहे. हेच निमित्त घेऊन पंचवीस सूत्रसंचालकांचा सन्मान आदर्श शिक्षिका रोहिणी चंद्रकांत मांजरेकर यांचे स्मृतीचिन्ह देऊन करण्यात येणार आहे. शाहीर दादा मांजरेकर यांचे मार्गदर्शन या सोहळ्याला लाभलेले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम पहिल्या सत्रात होणार असून 'छाया काव्य' या पुस्तकातील कवींच्या कवितांचे सादरीकरण व प्रदर्शन यावेळी होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त कार्यक्रमात सहभागी असलेल्या कलाकारांनाच प्रवेश दिला जाणार आहे असे कलाश्रमच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी सुचविलेले आहे.
अधिक माहितीसाठी अध्यक्ष नंदकुमार पाटील ९८६९००८८०५
Comments