गायक महेश काळे, गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांचे ‘विठ्ठला….’ हे उर्दू गाणे भक्तांच्या भेटीला.



आषाढ महिना जवळ आला की पंढरपूरला जाण्याचे वेध वारकऱ्यांना लागतात. साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आषाढ वारी यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकली नाही, वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे. यंदा वारी चुकल्याची हुरहूर जशी वारकऱ्यांच्या मनाला लागली आहे, तशीच कलाकारांच्या मनातही आहे. विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी गायक महेश काळे, कवी- गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी ‘विठ्ठला...... ' हे एक ‘युनिक’ गाणे तयार केले आहे, ज्याचे बोल उर्दू भाषेत आहेत.

या गाण्याच्या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून जी वारी टिपली आहे ती छायाचित्रे इथे वापरण्यात आली आहेत. तसेच संदेश भंडारे आणि योगेश पुराणिक यांनी वारीत टिपलेल्या काही छायाचित्रांचाही यात समावेश आहे. डॉन स्टुडिओची निर्मिती असलेल्या या गाण्याचे ध्वनिमिश्रण तुषार पंडित यांनी केले असून प्रेझेंटर लीड मीडियाचे विनोद सातव आहेत. या गाण्यासाठी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी कुठलेही मानधन न घेता काम केले आहे.

याविषयी बोलताना कवी-गीतकार वैभव जोशी म्हणाले की, कोरोना, लॉकडाऊनमुळे यंदा आषाढी वारी रद्द झाली आहे. आम्ही मित्र एकत्र येऊन गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा विठ्ठलाच्या चरणी रुजू करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे गाणे विठ्ठलावरचे असले तरीही उर्दूमध्ये लिहिले असल्यामुळे ते आगळे-वेगळे झाले आहे. माझे बालपण मंगळवेढा येथे गेले, तेव्हा अनेक पीरबाबांना वारी मध्ये सहभागी झालेले पाहिले होते. ते वारी मध्ये जातात, विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी होतात, त्यांना जर काही म्हणावेसे वाटले तर ते काय म्हणत असतील? त्यांच्या भावना उचंबळून आल्या तर ते कुठल्या पद्धतीने व्यक्त होत असतील? ते सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला असं वाटतं की जात - पात, धर्म, भाषा, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण निर्गुण निराकाराकडे पोहचले पाहिजे.

या गाण्याबद्दल बोलतांना प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी अमेरिकेतून आपल्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “या वर्षी वारी होऊ शकत नसल्यामुळे देवापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आम्ही या गाण्याची निर्मिती केली आहे. शिवाय या गाण्याच्या व्हिडीओमध्ये  महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या ‘एरियल फोटोग्राफी’चा अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. मी अभंग-भजन या सांप्रदायात लहानाचा मोठा झालो असल्यामुळे अभंग गातांना मला जो आनंद मिळतो तो एक विलक्षण अनुभव असतो. पुढे ते म्हणाले की हे गाणं करतांना आमच्या डोक्यात एक कल्पना आली की जर महाराष्ट्राची परंपरा माहित नसलेला एखादा सुफी संत वारीच्या काळात महाराष्ट्रात आला तर त्याच्यासाठी अनोळखी असलेली ही परंपरा त्याच्या दिव्यत्वामुळे त्याला त्याच्या ओळखीची वाटली तर तो या परंपरेच्या बद्दल आपुलकीने कसा व्यक्त होईल हे दर्शवणारे हे गाणं आहे.”

संगीतकार नरेंद्र भिडे म्हणाले की, विठ्ठलाची वारी, जी आषाढीला जाते ती यंदा दुर्दैवाने होऊ शकली नाही. या वारीमध्ये विविध संप्रदायाचे, धर्माचे लोक सहभागी होत असतात. आपल्याकडे शेख महंमद यांच्यासह इतर मुसलमान संत होऊन गेले आहेत, ज्यांनी विठ्ठलनामाचा गजर केला. आषाढीच्या निमित्ताने विठुरायांच्या चरणी सेवा अर्पण करताना एक गाणं मराठीत न करता त्याला वैश्विक परिमाण मिळायला हवे असे करावे हा विचार मनात आला, त्याप्रमाणे आम्ही तिघांनी हे गाणे उर्दूत करण्याचा निर्णय घेतला. एखादी सांप्रदायिक वळणाची चाल बांधायची म्हटलं की, पखवाज, टाळ, मृदंग, वीणा, चिपळ्या आदी प्रकारची वाद्य आपल्या डोळ्यासमोर येतात. या वाद्यांशिवाय ढोलक, डफ यावरही गाणे करता आले पाहिजे हा विचार आम्ही केला आणि एका इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात झाली. अनादी अनंत काळापासून निरनिराळ्या रीती-परंपरा, जाती-धर्म, भाषा-प्रांत या सगळ्याच्या अंतःकरणात भरून पावलेली अशी एक अदृश्य शक्ती आहे जी या गाण्यातून आपल्याला सतत भेटत राहते, तसेच विठ्ठलाच्या जयघोषातून ‘विठ्ठला’ ...... या तीन अक्षरातील ‘अल्ला’ सुद्धा आपल्याला भेटून जातो, हीच या गाण्याची एक नजाकत आहे !

Youtube Link:

Download Link:
https://mab.to/gnLAVGwK2AN

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर