5 ते 6 जानेवारीला रंगणार पं. राम मराठे स्मृती संगीत समारंभ

मुंबई - ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीतभूषण पं. राम. मराठे स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ५ ते ८ जानेवारी दरम्यान डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे त्यामुळे नववर्षाच्या प्रारंभीच ठाणेकर रसिकांना गायन-वादन आणि नृत्याची मेजवानीच मिळणार आहे. या संगीत महोत्सवाचे यंदाचे हे १९ वे वर्ष आहे. महोत्सवाचे उद््घाटन ५ जानेवारीला दुपारी ४ वाजता नमन नटवरा हा नाट्यसंगीत कार्यक्रमाने होणार आहे. यावेळी रामदास कामत, कीर्ती शिलेदार यांच्यासह सुरेश बापट आणि नीलाक्षी पेंढारकर बहारदार नाट्यगीते सादर करतील. याच दिवशी रात्री किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक ठाण्याचे गिरीश संझगिरी यांचे गायन होणार असून पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ सरोदवादक पं. ब्रिजनारायण यांच्या सरोदवादनाने होणार आहे.

दुसर्‍या दिवशी ६ जानेवारीला सकाळच्या विशेष सत्रात गिरीधर केतकर (कथ्थक नृत्य), डॉ. दिलीप गायतोंडे (हार्मोनियम वादन) हे सहभागी होणार आहेत. तसेच यंदा बालगंधर्वांची १२५ वी जयंती आहे. यानिमित्ताने नाट्य परिषद ठाणे शाखेच्या वतीने संगीत सौभद्र नाटकाचा प्रयोग महोत्सवात ठेवण्यात आला आहे. रविवारी रात्री ८.३0 वाजता दिल्लीचे तबलावादक अक्रम खान यांचे तबलावादन तसेच गायिका सावनी झेंडे हिच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. समारोहाची सांगता ज्येष्ठ सतारवादक पं. नयन घोष यांच्या सतार वादनाने होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर