फिल्मी न्यूज – 5 जानेवारी 2013
रवी जाधव चा बीपी म्हणजे 'बालक-पालक
'बालगंधर्व', 'नटरंग'च्या तुफान यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव बीपी म्हणजे 'बालक-पालक - या चित्रपटाद्वारे लैंगिक शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणार आहेत. चित्रपटाचा काळ 1985च्या आसपासचा आहे. किशोर कदम, सई ताम्हणकर, प्रथमेश परब, शाश्वती पिंपळकर, मदन देवधर, भाग्यश्री सपकाळ, रोहित फाळके, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यूट्युबवरदेखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खल्लास गर्ल आता मराठी सिनेमात
बॉलिवूडची खल्लास गर्ल ईशा कोप्पीकर आता मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करतेय. 'मात'हे ईशाच्या पहिल्या मराठी सिनेमाचे नाव आहे. मनोहर सरवणकर यांचे दिग्दर्शन असेला हा सिनेमा 'सायली ड्रीम सर्वांनाच भारावून टाकणारा असून आपल्या भूमिकेला विविध छटा असल्याचे ईशाने सांगितले. एका महत्वाकांक्षी दांपत्याची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. ईशाबरोबर अभिनेता समीर धर्माधिकारी या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाची पटकथा आणि संवाद संभाजी सावंत यांनी लिहिले आहेत. गीतकार संदीप खरेंच्या गीतांना संगीतकार सलील कुलकर्णी संगीत देणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
25 जानेवारी ला मोठय़ा पडद्यावर 'आजचा दिवस माझा'
सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर मोठय़ा पडद्यावर 'आजचा दिवस माझा' या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. 'आजचा दिवस माझा' हा चित्रपट राजकारणातील भाबडय़ा आशेवर, तेथे सत्तेसाठी चाललेल्या नागडय़ा स्वार्थावर आणि तरीही त्या राजकारणात दडलेल्या मानवी चेहऱ्यावर आधारीत आहे. या पाश्र्वभूमीवर सामान्य माणसाचे काय स्थान असते, याबाबतही हा चित्रपट भाष्य करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचे असून लेखन अजित व प्रशांत दळवी यांचे आहे. अश्विनी भावे व सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्री, हृषिकेश जोशी आणि आनंद इंगळे या कलाकारांनीही यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
सोनाक्षी करतेय डिस्को डान्स
चित्रपटसृष्टीत एखाद्या गुणी अभिनेत्याबाबत 'लंबी रेस का घोडा है' असं म्हटलं जात. अभिनेत्रींबाबत अशावेळी काय म्हणायचे असते? जे काही म्हणायचे असते ते सध्या सोनाक्षी सिन्हाला लागू पडत आहे. 'दबंग', 'राऊडी राठोड' आणि 'दबंग-2' अशा सुपरहिट चित्रपटांमुळे तिने इंडस्ट्रीतील आपले स्थान चांगलेच भक्कम केले आहे. सध्या ती आपल्या 'गांव की छोरी' या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठीची संधी तिला साजीद खानच्या 'हिंमतवाला'मध्ये मिळाली आहे. या चित्रपटात चक्क डिस्को करणार आहे. साजीदचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट जुन्या 'हिंमतवाला'चा रिमेक आहे. जुन्या चित्रपटाने जितेंद्रची कराकीर्द आणखी लांब केली होती आणि श्रीदेवीच्या कारकिर्दीस नवी सुरुवात झाली होती. आता सोनाक्षीही या नव्या 'हिंमतवाल'च्या निमित्ताने आपल्या नव्या इमेजची सुरुवात करीत आहे. साजीदच्या प्रत्येक चित्रपटात एखादे जुने गाणे नव्या रूपात हटकून असतेच. या चित्रपटातही तो कदाचित 'नमक हलाल' मधील 'जवानी जानेमन' हे गाणे ठेवण्याची शक्यता आहे. ग्रेसफुल सौंदर्य आणि मोहक नजाकतीने ठासून भरलेल्या परवीन बाबीने त्या गाण्यावर नृत्य केले होते. आता सोनाक्षी त्या किंवा अशाच एखाद्या डिस्को गाण्यावर नृत्य करीत असताना दिसेल. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात डिस्कोचा बराच बोलबाला होता. ती आठवण या चित्रपटात ताजी केली जाणार आहे. रंगीबेरंगी लाईट्स आणि चकाकणारे फ्लोअर्स यांच्या पार्श्वभूमीवर सोनाक्षी डिस्को करताना कशी दिसेल?
Comments