मराठमोळा अभिनेता चंद्रकांत
कपटांपासून 'बनगरवाडी'पर्यंत आपल्या अभियनसार्मथ्याने चित्रपटसृष्टी समृद्ध करणार्या गोपाळ मांढरे ऊर्फ चंद्रकांत यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. चित्रकलेच्या क्षेत्रात ज्याला 'कोल्हापूर स्कूल'म्हणतात त्यातही त्यांचे नाव अग्रभागी आहे. ज्या काळात चित्रपटाकडे वाईट नजरेने पाहिले जायचे त्या काळात चंद्रकांत यांनी आपल्या निर्मळ चारित्र्याने, गुरुनिष्ठेने, अभिनयाने नाव मिळविले. बाबुराव पेंटर, बाबा गजबर यांना ते गुरुस्थानी मानत. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी 'चंद्रकांत'हे नाव दिले. सावकारी पाश, शेजारी, छत्रपती शिवाजी अशी त्या काळातल्या चित्रपटांची नावे जरी घेतली तरी ती संस्कारक्षम पिढी डोळ्यापुढे उभी राहते. राजर्षी शाहू छत्रपतींच्या दूरदृष्टीने कोल्हापूरचे 'कलापूर'झाले याची कृतज्ञ जाणीव चंद्रकांतांनी आयुष्यभर सांभाळली. स्वत:च कलादालन उभे केले. स्वत:च्या राहत्या घरासह कलाकृतीदेखील राज्यशासनाच्या स्वाधीन करणारा महाराष्ट्रातला हा थोर कलावंत म्हणजे मराठी संस्कृतीचा मानदंड आहे. आपल्याला जे पुरस्कार मिळाले त्यातूनच आपल्या उत्तर आयुष्यात कलावंतांना पुरस्कार देणारा चंद्रकांत यांच्यासारखा कदरदारही दुर्मिळच म्हणावा लागेल. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या चित्रनगरीला नाव देण्यावरून जेव्हा वाद झाला तेव्हा चंद्रकांतांनी अतिशय स्पष्टपणे बाबुराव पेंटर यांचे नाव देणे आवश्यक असल्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितली. वेळांचे काटेकोर नियोजन, कठोर निर्व्यसनीपण, स्वत:च्या कुटुंबावर निस्सीम प्रेम, सलग ७५ वर्षे न चुकता रोजनिशी लिहिण्याचा उपक्रम अशी कितीतरी त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. किमान दहाहून अधिक हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. एका इंग्रजी चित्रपटात आपण शहाजीराजांचे संवाद कसे पाठ केले हे त्यांच्या तोंडून ऐकताना त्यांच्यातील निर्मळपणाचे लख्ख दर्शन होत असे. एकाच कलावंताने शिवाजी महाराज, शहाजीराजे, संभाजीराजे या तीनही भूमिका केल्याचे उदाहरणही दुर्मिळ म्हणावे लागेल. कलावंताने शरीर कमावले पाहिजे आणि मनाची जडणघडण केली पाहिजे हा आग्रह त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणला. मुला-मुलींसाठी मोफत पावडर शेडिंगचे वर्ग चालविणारा हा कलाकार निसर्गप्रेमी होता. यशवंतरावांपासून वसंतदादांपर्यंत आणि शिवसेनाप्रमुखांपासून अनेक नेत्यांचा स्नेह त्यांना लाभला. परंतु राजसत्तेकडे त्यांनी काहीही मागितले नाही.
Comments