प्रशांत दामले चा 10700 वा गेला माधव कुणीकडे

मुंबई - मराठी रंगभूमीवर अनेक विक्रमांना गवसणी घालत, आपल्या खास शैलीतील अभिनयाने तमाम नाट्यरसिकांचा लाडका अभिनेता म्हणून मान्यता मिळालेला प्रशांत दामले आता तब्बल १0७00 व्या विक्रमी प्रयोगाचा टप्पा ओलांडणार आहे. 'गेला माधव कुणीकडे' या त्याच्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने हा विक्रम साकारला जाणार आहे. या विक्रमी प्रयोगाचे औचित्य साधून ५ जानेवारी रोजी एका खास सोहळ्याचे आयोजन 'प्रशांत दामले स्वागत समिती'तर्फे करण्यात आले आहे. या समितीत रत्नाकर मतकरी, अशोक पत्की, पुरुषोत्तम बेर्डे, सुधीर भट या व अशा अनेक दिग्गजांचा समावेश असून, या समितीच्या अध्यक्षस्थानी महापौर सुनील प्रभू आहेत. प्रशांत दामलेविषयी मान्यवरांचे मनोगत मांडणारा 'एक प्रशांत महासागर' हा विशेषांकही यावेळी प्रसिद्ध होणार आहे.


१0७00 व्या प्रयोगाच्या निमित्ताने संवाद साधताना प्रशांत म्हणतो, हे यश माझे एकट्याचे नाही, कारण नाटकाचा मूळ पाया लेखक आणि दिग्दर्शकाचा असतो. ही जोडीच नटाला मोठे करू शकते. रंगभूमीवरील एकंदर विनोदी प्रक्रियेविषयी प्रशांत सांगतो, विनोदाला समोरच्या कलावंताची येणारी अचूक रिअँक्शन ही विनोदी नाटकातील महत्त्वाची गोष्ट आहे. शब्दांवर प्रभुत्व असेल, तर आपोआपच रिअँक्शन येत राहतात. विनोद करणे आणि त्यातही स्वच्छ विनोद करणे यापेक्षा कुठलीही गोष्ट अधिक कठीण नाही. हसवण्याची क्रिया सर्वात अवघड असून ते एक चॅलेंज आहे. परंतु संहिता कमजोर असली, तरी कधीही कमरेखालील विनोद करायचा नाही, असे इतक्या वर्षांत बंधन घालून घेतले आहे.

मी हुशार नट नाही, मी मेहनती नट असल्याचे सांगणारा प्रशांत 'लेकुरे उदंड झाली' व 'बे दुणे पाच' या नाटकांतील भूमिका सर्वात अवघड होत्या, असे स्पष्ट करतो. त्याच्याविषयी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर म्हणतात, आज प्रशांत विक्रमवीर असला तरी त्याच्या मुळाशी रंगभूमीविषयी निष्ठा आहे. अभिनयाला वाहून घेणे म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत दामले! पुढे जाऊन तो पन्नास हजार प्रयोगही करू शकेल. एका अशांत महासागरापासून त्याचा प्रशांत महासागर झाला आहे.

'टूरटूर' हे नाटक लक्ष्मीकांत बेर्डे व विजय कदम यांना समोर ठेवूनच लिहिले होते. पण मला एक गाणारा मुलगा हवा होता आणि तेव्हा मला प्रशांत सापडला. ज्या मुलाचे नावही मला तेव्हा माहीत नव्हते, तेच नाव आज एवढे मोठे झाले असल्याचा आनंद वाटतो, असे मत प्रशांतविषयी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे मांडतात. नाटक लिहून झाल्यावर त्यातल्या भूमिकेचे वजन कळते. नाटकाला वजन द्यायला नटाचे सहाय्य होते. नट आणि नाटक ही जोडी उत्तम जमली तर दोघेही मोठे होतात, असे भाष्य प्रशांतच्या विक्रमी प्रयोगाच्या निमित्ताने बोलताना साहित्यिक व नाटककार रत्नाकर मतकरी करतात. आतापर्यंत रंगभूमीवरील विविध विक्रम नावावर असलेल्या प्रशांत दामलेच्या १0७00 व्या प्रयोगासह होणार्‍या सोहळ्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्यासह राज ठाकरे, नितीन गडकरी आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर