मकरंद अनासपुरे म्हणतात कि प्रत्येकाने आवर्जून पहिलाच पाहिजे असा चित्रपट ‘पिपाणी’
शेतकऱ्यांच्या समस्यां हा महाराष्ट्रातला सध्याचा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे या प्रश्नावर वेगळे भाष्य करणारा आणि हे वेगळे भाष्य परिणामकारक पद्धतीने मांडणारा पिपाणी हा चित्रपट महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पहिलाच पाहिजे असे या चित्रपटाचा नायक मकरंद अनासपुरेने म्हटले आहे.
तनिष्क डिजीटल आय प्रस्तुत, बाबुराव भोर निर्मित गजेंद्र आहिरे दिग्दर्शित पिपाणी हा चित्रपट येत्या बारा ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. गजेंद्र आहिरे हा दिग्दर्शक आजवर समस्या प्रधान गोष्टी सातत्याने हाताळतो आहे. इथेही त्याने शेतकऱ्यांच्या सद्य स्थितीचा,त्यांच्या समस्यांचा विषय हाताळला आहे.मकरंदने स्पष्ट केले की, या विषयाचे गांभीर्य तसेच सध्याची शेतकऱ्यांच्या चिंताजनक परिस्थितीची टोकदार जाणीव प्रेक्षकांना करून द्यावी ह्यासाठी ब्लॅक कॉमेडीचा आधार या चित्रपटात घेण्यात आला आहे. हसता हसता प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा चित्रपट आहे.
मकरंदने या चित्रपटात गावातल्या सगळ्या गोष्टींशी परिचय असलेला,प्रत्येक घराघराशी संपर्क असलेला आणि मिस्टर ग्रामीण हे विशेषण सार्थ ठरवणारा विदर्भातला पोपटराव साकारला आहे. चुरचुरीत बोलणे आणि आपल्या हजरजबाबीपणामुळे पोपटरावकडे आपसूक ह्या गावाचे कर्तेपण आलेले आहे. हॉलीवुड चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणीला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने चित्रपट निर्मिती तिला करायची आहे. एका विदेशी तरुणीला काळ्या मातीतल्या करड्या माणसांचा आभ्यास पोपटला अंचभीत करुन सोडतो. गावतल्या अनेक समस्यांचा, इरसाल गावकऱ्यांचा परिचय त्या तरुणीला करून देता देता तो या चित्रपटाच्या निर्मितीतही सहभागी होतो आणि एक वेगळाच सिनेमा प्रेक्षकांसमोर येतो. मकरंदने अफलातून अशी ही व्यक्तीरेखा रंगवली आहे.
मकरंद सोबतच चंद्रकांत कुलकर्णी, रवी काळे,रमेश देव,क्रांती रेडकर,हेमांगी कवी,वैभव मांगले,भारत गणेशपुरे, विकास समुद्रे अशी दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात आहे. अगदी छोट्या भूमिकांसाठीही मोठ्या ताकदीच्या कलाकारांची फळी असल्यामुळे या चित्रपटाची अभिनयाची बाजू भक्कम आहे. जर्मन अभिनेत्री क्रिस्तीन हिचा हा पहिलाच चित्रपट तिनेही सर्वच कलावंतांशी आणि मराठी भाषेशी समरस होऊन या चित्रपटात अत्यंत उत्तम काम केले असल्याचे सांगून मकरंद म्हणाला की प्रेक्षक हा चाकोरीबाहेरचा तरीही मनोरंजनातून अंजन घालणारा चित्रपट आवर्जून पाहतील असा मला विश्वास आहे.
Comments