रहस्यमय चित्रपट अशात एका बेटावर

मुंबई - जगप्रसिद्ध रहस्य कथाकार अगाथा ख्रिस्ती यांनी सुमारे ७0 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'अँण्ड देन देअर वेअर नन'वर हा चित्रपट आधारलेला आहे. १९६७मध्ये याच कथेवर 'गुमनाम' हा गाजलेला सिनेमा आला. तो अजूनही रसिकांच्या मनात घर करून बसला आहे. त्यातील अभिनय, थरार, उत्कंठा, गाणीही हीट झाली आहेत. त्या चित्रपटाची तुलना या चित्रपटाशी करणे यथोचित ठरत नसले तरी, अनेक प्रसंग त्या हिंदी सिनेमाची आठवण करून देतात, हे नाकारता येत नाही. कारण, मराठी रसिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीवरही जिवापाड प्रेम केले आहे, त्यातल्या चांगलेपणाचे कौतुकही केले आहे.


हे सारे विसरून मराठी भाषेतला आजचा चित्रपट म्हणून 'अशाच एका बेटावर' या कलाकृतीकडे बघितले तर, रहस्यमयता कमावण्यात सिनेमा कुठेही कमी पडत नाही. निर्जन बेटावर गेलेले अंकुश चौधरी (आकाश), मधुरा वेलणकर (अमिता), संजय मोने (डॉ. विजय), मंगेश देसाई (साधू महाराज), शरद पोंक्षे (अँड. कामत), यतीन कार्येकर (जनार्दन), सई ताम्हणकर (शबनम), कमलेश सावंत (यशवंत) या आठही जणांची व्यवस्था करणारे दाम्पत्य सखाराम आणि कावेरी. अर्थात, संजय नार्वेकर आणि पूनम जाधव. या दहाही कलावंतांचा अभिनय या रहस्यकथेचा साज ठरला आहे. त्यातही हिंदी भाषिक बारगर्ल म्हणून शबनमची भूमिका साकारणार्‍या सई ताम्हणकरने पुन्हा एकदा 'बिनधास्त'पणासाठी मिळालेल्या संधीचे सोनेच केले आहे.

रहस्य टिकवून ठेवण्यासाठी हे सारे सुरू असताना या चित्रपटाचा शेवट मात्र वरवरचा आहे. बेटावर बोलावण्यात आलेले सारे कुठल्यातरी गुन्ह्यातले आरोपी आहेत. पण, त्यांना पुराव्याअभावी शिक्षा ठोठावता आली नाही, म्हणून त्यांना या बेटावर बोलावून संपविण्याचा बेत एका न्यायाधीशाने आखला आहे.

हा न्यायाधीश कोण? हे चित्रपटात असले तरी, त्या गुन्हेगारांचे गुन्हे पाहिजे त्या ताकदीने अधोरेखित होत नाहीत, इथे पटकथा फसल्याचे जाणवते. सोबतच एक न्यायाधीश अशा प्रकारे शिक्षा देण्याचे ठरवतो, त्याची आयडियॉलॉजी कुठेच स्पष्ट झाली नाही. त्यामुळे हे सारे केवळ अविश्‍वसनीय वाटते.

रहस्यमयतेच्या आहारी जाण्यापेक्षा हा चित्रपट वेगळ्या नोटवर पोहोचवता आला नसता का? असाही विचार करायला हा चित्रपट भाग पाडतो. प्रत्येकात एक गुन्हेगार दडलेला असतो, तो गुन्हा करायचा म्हणून करत नसेलही; पण त्याने तो केलेला असतो. अशा बेसावधपणे होणार्‍या गुन्ह्यांवर मात करण्यासाठी 'समुपदेशन' करणारा हा चित्रपट असता तर.. पण, या जर-तरला आता अर्थ नाही. कारण, हे नाटक नाही, चित्रपट आहे.

चित्रपट का पाहावा? रहस्यपटासाठी कलावंतांनी केलेला सहज अभिनय पाहायला हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA