Flashback - रमेश व सीमा देवला कसा भेटला "आनंद"

 ते १९६९ साल होतं. हेमंतकुमार यांच्या "बिस साल पहले" या सिनेमाचे शूटिंग चालू होते. या सिनेमात आपले ज्येष्ठ कलाकार रमेश देव व्हिलनचे काम करत होते. शूटिंग पहायला तिथे एन सी सिप्पी आणि हृषिकेश मुखर्जी पण आले होते. एका खूप मोठ्या लांबलचक प्रसंगाचे शूट चालू होते. रमेश देव यांना खूप संवाद आणि मूव्हमेंट असलेला तो प्रसंग होता.

पहिल्याच "टेक" मध्ये रमेश देव यांनी तो शॉट ओके केला. ते पाहून हृषीकेश मुखर्जी यांना रमेश देव यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यांनी हेमंतदा यांचेकडे अधिक चौकशी केली तेंव्हा त्यांना समजले की रमेश देव हे मराठीतले नामवंत कलाकार आहेत, हिरो आणि व्हिलन दोन्ही कामं उत्तम करतात, वेळ पाळणारे, सौजन्याने वागणारे, निर्व्यसनी एक उत्कृष्ठ कलाकार आहेत.

त्यानंतर दोन तीन दिवसांनी रमेश देव यांना एक अनोळखी फोन आला. फोनवर निरोप मिळाला की तुम्हाला दादांनी दुपारी दोन वाजता रणजित स्टुडिओत भेटायला बोलावले आहे. रमेश देव वेळेआधी म्हणजे दीड वाजताच स्टुडिओत पोहोचले. त्यांना पहाताच ओळखून एक मराठी माणूस त्यांची चौकशी करायला पुढे आला. त्याने विचारले, " साहेब आपण इकडे कोठे ?" त्यावर रमेश देव म्हणाले,"मला दादांनी दोन वाजता भेटायला बोलावले आहे, पण हे दादा कोण आहेत ?"

तो मराठी माणूस हसून म्हणाला,"अहो दादा म्हणजे हृषीकेश मुखर्जी, भाग्यवान आहात, दादा म्हणजे मोठा माणूस आहे".

रमेश देवना आश्चर्य वाटले. हिंदीमधल्या एव्हढ्या मोठया दिग्दर्शकाने कशाला बोलावले असावे ? पावणे दोन वाजताच रमेश देव दादांच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. ऑफिस मध्ये टेबलामागे दोन माणसे बसली होती आणि रमेश देवना परत आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. त्यांना आठवले की हेच दोन्ही गृहस्थ "बिस साल पहले" चे शूटिंग बघायला आले होते. पण त्यांची नावे माहिती नव्हती.

संभाषणाची सूत्रे हातात घेत दादांनी ओळख करून दिली. "मी हृषीकेश मुखर्जी आणि हे सिप्पी साहेब, आम्ही तुमचं काम पाहिले आहे. आम्ही एक चित्रपट काढतो आहोत. त्याचं नाव

"आनंद", ---( इथे "आनंद" बद्दल थोडेसे- हृषीकेश मुखर्जी प्रथम राज कपूरला घेऊन आनंद काढणार होते,नंतर राजजींच्या ऐवजी किशोरकुमारला घेऊन काढणार होते, ते ही जमले नाही, अखेर राजेश खन्नाचा नंबर लागला ) आनंद मध्ये ४ प्रमुख भूमिका आहेत. त्यापैकी दोघेजण म्हणजे राजेश खन्ना आणि नवीन अमिताभ बच्चन आहेत. उरलेल्या दोन भूमिका पती-पत्नी यांच्या आहेत. त्यापैकी पती ची भूमिका तुम्हाला करायची आहे". साहजिकच रमेश देवांनी विचारले,"पत्नीची भूमिका कोण करणार आहे ?" "सीमाजी"- हृषिदा म्हणाले. आज रमेश देवांना एकावर एक धक्के बसत होते. हृषिदांनी विचारले," तुमच्या मिसेस सीमाजी करतील ना काम ?" रमेश देव म्हणाले,"ती काय तिचा नवरा पण काम करेल".

ऑफिसमधून बाहेर पडताना हृषिदांनी रमेश देवांच्या हातात ऍडव्हान्स चे दोन चेक ठेवले. एक त्यांचा आणि एक सीमाजींचा.

रमेश देव हृषिदांना प्रथमच भेटतात काय, सुपरस्टार राजेश खन्नाबरोबर काम मिळते काय, ऋषिदांचे हाताखाली काम मिळते काय,जोडीला सीमाताईंनाही काम मिळून लगेच ऍडव्हान्स मिळतो काय ! एका पाठोपाठ आश्चर्याचे धक्के बसत होते.

'आनंद" चे शूटिंग सुरू झाले. दुपारच्या सुट्टीत त्यांच्या बरोबर जेवायला अमिताभ पण असे. तेंव्हा तो नवीनच होता. एकदा शुटिंगचे दरम्यान सिप्पी आणि हृषिदा काळजीत असलेले रमेश देवना दिसले. त्यांनी विचारले,"दादा काय झाले ?" हृषीदा म्हणाले,"सुपरस्टार राजेश खन्नाचा मृत्यू होतो असा सिनेमाचा शेवट आहे, तो प्रेक्षकांना कितपत रुचेल ? आणि त्यामुळे सिनेमा चालेल का नाही याची काळजी वाटते".

त्यावर रमेश देव म्हणाले, "दादा काळजी करू नका, हा चित्रपट सिल्व्हर ज्युबिली नक्की करणार ". बरोबर सीमाताई पण होत्या त्या दादांना म्हणाल्या," मी  सिद्धीविनायकाला नवस बोलले आहे, सिल्व्हर ज्युबिली नक्की होणार.

सिप्पी साहेब आणि हृषीदा या देव पती पत्नीकडे पहातच राहिले आणि म्हणाले," सिल्व्हर ज्युबिली झाली तर तुम्हा दोघांना मी दहा दहा हजार रुपये बक्षिस देईन".

नंतर शूटिंगच्या गडबडीत रमेश देव आणि सीमाताई हा प्रसंग विसरूनही गेले. १९७१ साली रिलीज झालेल्या "आनंद" ने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची पकड घेतली. "आनंद" ने दणक्यात सिल्व्हर ज्युबिली साजरी केली. आणि एक दिवस हृषिदांचा एक माणूस रमेश देव यांच्या घरी हजर झाला. त्याने रमेश देव यांच्या हातात दोन एनव्हलप ठेवले. एक रमेश देव यांच्या नावाचे तर दुसरे सीमाजीं च्या नावाचे !

रमेश देव यांनी एन्व्हलप उघडले तर आत मध्ये दहा हजारांचा एक चेक होता. तर दुसरा सीमाजींच्या नावाचा ! तेंव्हा मराठी सिनेमाचे बजेट पन्नास साठ हजार होते ! हृषिदांनी त्यांचा शब्द पाळला होता !

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA