'दुनियादारी' ही कादंबरी आता रुपेरी पडद्यावर

मुंबई - मराठी साहित्यविश्‍वात तब्बल तीन दशके गाजत असलेली सुहास शिरवळकर यांची 'दुनियादारी' ही कादंबरी आता रुपेरी पडद्यावर अवतरणार असून, हे शिवधनुष्य पेलण्यासाठी 'महाराष्ट्र कलानिधी'ने सहकार्याचा हात पुढे केला आहे. या सिनेमाच्या नियोजित चित्रीकरणाच्या दरम्यान उभ्या ठाकलेल्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी 'कलानिधी'ने या टीमच्या मागे पाठबळ उभे केले असून, यानिमित्ताने 'महाराष्ट्र कलानिधी'ने वचनपूर्तीही साध्य केली आहे.


वास्तविक 'दुनियादारी'चे चित्रीकरण कोल्हापूरच्या शालिनी पॅलेसमध्ये होणार होते. परंतु तारखा जुळवून सगळी सज्जता झाल्यावर शालिनी पॅलेसवर जप्ती आली. परिणामी आर्थिक व्यवहार कोलमडल्याने चित्रीकरणासाठी पुण्याच्या कृषी विद्यापीठाची निवड करण्यात आली. मात्र तेथील दर आवाक्याच्या बाहेर असल्याने चित्रीकरण पुन्हा रखडले आणि याचवेळी 'महाराष्ट्र कलानिधी'ने 'दुनियादारी'मध्ये एंट्री करीत चित्रीकरणाचा मार्ग मोकळा केला. कलेविषयी निष्ठा राखणार्‍या नाट्य व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व कलावंतांना सक्षम करण्याचा 'महाराष्ट्र कलानिधी'ने घेतलेला वसा 'दुनियादारी'च्या निमित्ताने पूर्णत्वास गेला आहे.

'दुनियादारी'वर सिनेमा करणे हे माझे २0 वर्षांपासूनचे स्वप्न होते. या निर्मितीच्या दरम्यान मला तर दुनियादारी करावी लागलीच, परंतु माझ्यासाठीही कुणी तरी दुनियादारी करीत आहे याची प्रचिती आली आणि मोठा धीर आला. शालिनी पॅलेसवरील जप्ती आणि त्यानंतर घडलेला सगळा घटनाक्रम सुन्न करणारा होता. महाराष्ट्र कलानिधीमुळेच हा सिनेमा आता पडद्यावर झळकणार आहे, असे मत या सिनेमाचे निर्माते व दिग्दर्शक संजय जाधव व्यक्त करतात. 'दुनियादारी'ला सहकार्य करताना संजय जाधव यांची निष्ठा आम्ही पाहिली असल्याचे मत 'महाराष्ट्र कलानिधी'चे प्रवर्तक नितेश राणे व अनंत पणशीकर मांडतात.

कोणत्याही मराठी निर्मात्याला आपल्या कलाकृतींसाठी अनुदानाच्या कुबड्या लागू नयेत. मराठीजनांनी एकमेकांचे केवळ आभार मानत बसण्यापेक्षा एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मराठी कलावंतांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी व मनोरंजन उद्योगाला पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र कलानिधी कटिबद्ध आहे, असा विश्‍वास नितेश राणे व्यक्त करतात.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA