'ई-टीव्ही' मराठीवरील 'ढोलकीच्या तालावर'

'ई-टीव्ही' मराठीवरील 'ढोलकीच्या तालावर' या यशस्वी रिअँलिटी शो नंतर दिग्दर्शक संतोष कोल्हे, महाराष्ट्राची पहिली 'लावणीसम्राज्ञी' वैशाली जाधव आाणि महावस्ताद 'पानिपत'कार विश्वास पाटील 'नजराणा लावणीचा' हा लावणीवर आधारित आगळावेगळा बहारदार कार्यक्रम रंगमंचावर घेऊन आले आहेत. मराठी रुपेरी पडद्यावरील बाई सुंदराबाई ते राम कदम यांच्या लावणीचा प्रवास, पारंपरिक लावणीचा पेशवाईपासून आतापर्यंतचा प्रवास, 20 वर्षात मॉर्डन लावणीमध्ये झालेले प्रयोग अशा 3 टप्प्यात 'नजराणा लावणीचा' हा कार्यक्रम रंगभूमीवर सादर करण्यात आला आहे.

'लॉजिकल थिंकर्स' आणि 'स्पेस डिझाइन' संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'नजराणा लावणीचा' कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. ढोलकीच्या तालावर रिअँलिटी शोची पहिली विजेती 'लावणीसम्राज्ञी' वैशाली जाधव ही या कार्यक्रमाची खास आकर्षण असणार असून तिच्या सोबत नृत्यांगणा गौरी जाधव, अमृता जोशी, सुझेन बरनेट आणि 30 सहकलाकारांचा भव्य संच या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. संतोष-विश्वास निर्मित या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले असून कार्यक्रमाचे लेखन 'पानिपत'कार विश्वास पाटील व डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले आहे. सुनील देवळेकर यांनी या कार्यक्रमाचे कलादिग्दर्शन केले असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. संतोष भांगरे व संतोष आमरे यांनी या दिलखेचक लावण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. 'नजराणा लावणीचा' कार्यक्रमात आजवर प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या, ऐकलेल्या लावण्या सादर करण्यात आल्या असून पुरुषांनी गायलेल्या लावण्यांचाही यात समावेश आहे, हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्टय़ आहे. तसेच हा कार्यक्रम सहकुटुंब बघता येऊ शकतो हे आणखी एक विशेष या कार्यक्रमासंबंधी सांगता येईल. याशिवाय सुधीर फडके, ग.दि. माडगुळकर, राम कदम, जगदीश खेबूडकर यांसारख्या अनेक कलावंतांनी चित्रपटातील लावण्यांसाठी दिलेल्या योगदानाची दखलही या कार्यक्रमात घेतली गेली आहे. जयश्री गडकर, हंसा वाडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण सारख्या नायिकांच्या चित्रपटांतील गाजलेल्या लावण्यांवर वैशाली जाधव, तीन नृत्यांगणा आणि सहकलाकार यांनी दमदार परफॉर्मन्स दिले आहेत. त्यांनी दिलेले परफॉर्मन्स प्रेक्षकांचा पसंतीस उतरत आहेत. 'लावणी' ही आचकट-विचकट, पुरुषांच्या शिटय़ा, विचित्र हावभाव म्हणजे लावणी ही एकप्रकारे आयटम साँग आहे, ही ओळख या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुसून टाकण्यात आली आहे. या महत्त्वाच्या कारणामुळे हा कार्यक्रम सहकुटुंब बघता येण्यासारखा आहे. तसेच सादरीकरणाच्या बाबतीत असलेले वैविध्य, विविध प्रकारच्या साधन साहित्यांचा, प्रॉपर्टीचा वापर, भव्य दिव्य सेट, लावणीचा इतिहास सांगणारा दृक्श्रव्य कार्यक्रमाचा आस्वाद तसेच जुन्या ज्या लावण्या विस्मरणात गेल्या आहे त्यांची नव्याने ओळख या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असल्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA