प्रतिबिंब मराठी नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ

90 दशकामध्ये मराठी नाटकांचा चांगला काळ होता. तो काळ आजही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आताची मुले तरुण पिढी नाटकामध्ये वेगळे प्रयोग करीत आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मराठी प्रेक्षक हा नाटकवेडा आहे, असे म्हटले जाते. ही गोष्ट खरी आहे. अजूनही मराठी नाटकासाठी कितीही रुपयाचे तिकीट काढून हा प्रेक्षकवर्ग नाटक बघायला जातो, असे नाट्यलेखक, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

एनसीपीए प्रतिबिंब - मराठी नाट्य महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता झाला. याप्रसंगी आविष्कारचे संस्थापक अरुण काकडे यांच्या हस्ते सतीश आळेकर यांचा सत्कार करण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. माझं नाटक येण्याआधी प्रत्येक नाटकाचं अनौपचारिक वाचन या वास्तूमध्ये झालेले आहे, याप्रसंगी आळेकर बोलत होते.

एनसीपीएच्या एक्सपेरीमेंटल थिएटरच्या उद््घाटनानंतर सतीश आळेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रलय या नाटकाचा पहिला प्रयोग इथे सादर झाला होता. यामुळे या वास्तूशी आळेकरांचा खूप जवळचा संबंध आहे, म्हणूनच आज आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत, असे एनसीपीएच्या प्रोग्रामिंग मुख्य (रंगभूमी आणि चित्रपट) दीपा गेहलोत यांनी सांगितले.

महोत्सवाच्या सुरुवातीला अतुल पेठे यांच्याद्वारे द प्लेराईट नावाची डॉक्युमेंट्री दाखविण्यात आली. या डॉक्युमेंट्रीमध्ये सतीश आळेकर यांचा नाटककार म्हणून प्रवास उलगडून दाखविला आहे. महोत्सवाची सुरुवात आविष्कार निर्मितीचे चित्रगोष्टी या नाटकाने झाली. ७ ऑगस्टपर्यंत हा नाट्यमहोत्सव सुरू राहणार आहे. यामध्ये लखलख चंदेरी, शोकपर्व, अपूर्णात अपूर्णम, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, सत्यशोधक अशी नाटके बघायला मिळणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA